नागरिक पत्रकारितेचं खुलं व्यासपीठ www.liveenews.com सुरू करताना आम्हाला अत्यंत आनंद होत आहे. सर्व नागरिकाचे, वाचकांचे, पत्रकार तसेच जनसंवाद आणि वृत्तपत्रविद्या विभागातील विद्यार्थ्यांचे या वेब न्यूज पोर्टलवर मनपूर्वक स्वागत आहे. हे पोर्टल नागरिक पत्रकारितेचं खुलं व्यासपीठ असून नागरिक पत्रकारीतेच्या विकासाच्या अनुषंगाने हे उचललेले पाऊल आहे. या वेब न्यूज पोर्टलवर कोणतीही व्यक्ती बातमीच्या किंवा लेखांच्या स्वरुपात आपले मत व्यक्त करण्यास भारताचा नागरिक या अर्थाने सक्षम आहे. संविधानातील कलम 19 1 (अ) नुसार माध्यमसंस्थेचे स्वातंत्र्य हे भाषण व अभिव्यक्ती स्वातंत्र्यातच समावलेले असल्यामुळे माध्यम संस्थाना पुन्हा वेगळे अधिकार देण्याची गरज नाही. ’वृत्तपत्र‘ किंवा ‘प्रेस‘ हे शब्द ‘नागरिक‘ किंवा ‘व्यक्ती‘ या अर्थानेही वापरले जातात. व्यक्ती म्हणून नागरिकास जे अधिकार (हक्क) वापरता येतात त्याखेरीज वृत्तपत्राला वेगळे असे हक्क नाहीत. वृत्तपत्राचा, माध्यमांचा संपादक किंवा प्रतिनिधी प्रथम देशाचा नागरिक असतो. त्यामुळे तो जेव्हा एखाद्या वृत्तपत्राचे प्रतिनिधीत्व करतो तेव्हा तो त्याच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचाच वापर करीत असतो.
या अनुषंगाने आपली प्रतिक्रिया, लेख, विचार, मतेमतांतरे, बातमी, माहिती असे एकंदर साहित्य प्रकाशीत करण्यास आपण मुख्य प्रवाहातील पत्रकार असणे गरजेचे नाही. भारतीय राज्यघटनेव्दारे भाषण व अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे जे अधिकार एका सामान्य नागरिकास प्राप्त झाले आहेत त्यापेक्षा अधिक अधिकार पत्रकाराला नाहीत. सर्वसामान्य नागरिकाला सुध्दा अशा प्रकारचे मत मांडण्याचे, लिखाण करण्याचे अधिकार भारतीय राज्यघटनेव्दारे बहाल करण्यात आले आहे. या अधिकाराचा वापर आपण नागरिक पत्रकारिता करण्यासाठी करावा व व्यक्ती, समाज तथा राष्ट्राच्या एकंदर विकासात हातभार लावावा हेच या व्यासपीठाव्दारे सांगायचे आहे.